aaiche-dudh-balasathi-naisargik-tonik-aste

 

बाळाच्या सकस पोषणासाठी व त्याच्या मानसिक वाढीसाठी सुद्धा स्तनपान खूप महत्वाचे आहे तरीही बऱ्याच माता बाळाला स्तनपान करत नाही. युनिसेफ, जी माता व बाळाच्या आरोग्यावर काम करणारी जागतिक संघटना व जागतिक आरोग्य संघटना यांच्या अहवालानुसार, सहा महिन्यापर्यंत फक्त ४० टक्के मुलांना स्तनपान मिळते. आणि फक्त २३ देशांमध्ये स्तनपान करण्याचा दर ६० टक्क्यापेक्षा अधिक आहे. जन्मापासून पुढील दोन वर्षापर्यंत स्तनपान करणे आवश्यक असताना बऱ्याच माता स्तनपान मध्येच बंद करतात. असे करू नये.

जागतिक स्तरावरच्या संशोधनानुसार, अनुभव असलेली जुनी लोकही, आणि आयुर्वेदाचार्य यांनीही स्तनपान बाळाला खूप महत्वाचे आहे असेच सांगितले आहे. आणि जर तुम्हाला अंगावरचे दूध येतच नसेल तर तुम्ही इतर पर्याय स्वीकारू शकता. वाटल्यास त्यासाठी दूध वाढवण्यासाठीचा आहार घ्या. आणि जर तुम्ही जॉब, नोकरी, यामुळे स्तनपान राहत असेल तर लक्षात घ्या आईच्या दुधाशिवाय बाळाचे संपूर्ण पोषण होणार नाही. त्यामुळे स्तनपान नियमित करावे.  

आईच्या दुधात,  बाळाच्या वेगवान वाढीसाठी उच्च दर्जाची प्रथिनं, अमिनो अ‍ॅसिड्स असतात, तशीच बाळाची मज्जासंस्था आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक ओमेगा-३ अ‍ॅसिड्स ‘आणि कोलेस्टेरॉलपण असतं. बाळाला कार्यशक्ती पुरवण्यासाठी आहे लॅक्टोज आणि गॅलॅक्टोज प्रकारची साखर. व्हिटॅमिन्स ए, डी, ई, सी आणि क्षारसुद्धा आवश्यक प्रमाणात असतातच.

आईचं दूध पिणाऱ्या बाळाला पाणी पिण्याची जरूर नसते. या सगळ्याव्यतिरिक्त आई बाळाला देते एक महत्त्वाची देणगी- अ‍ॅलर्जी आणि जंतुसंसर्ग यांपासून संरक्षण. बाळाच्या जन्मानंतर जे पहिलं दाट पिवळसर दूध येतं त्याला चीक किंवा कोलोस्ट्रम म्हणतात. त्यात संरक्षक पांढऱ्या पेशी भरपूर असतात. तसंच आय. जी. ए. नावाचं प्रथिनं- ज्याचा थर बाळाच्या आतडय़ांवर बसला की बाळाचं पोट आपोआप साफ होतं आणि आतडी विकसित-परिपक्व व्हायला मोलाची मदत होते. पुढच्या ३ ते ६ महिन्यांपर्यंत आई बाळाला ही संरक्षक प्रथिनं देत राहते.

सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ‘ब्रेस्ट क्रॉल’. जन्मानंतर काही मिनिटांतच (नाळ कापल्याबरोबर) बाळाला आईच्या छातीवर ठेवलं जातं. त्वचेचा त्वचेशी संपर्क होताच बाळाला प्रेरणा मिळते आणि काही मिनिटांचं ते बाळ कोलोस्ट्रम मिळवण्याचा प्रयत्न करू लागतं. बाळाच्या ओठांचा, जिभेचा स्पर्श होताच आईच्या शरीरात संप्रेरकं स्रवू लागतात आणि आईला ‘पान्हा’ फुटतो. नुकतंच जन्मलेलं वासरू किंवा पाडस झिडपिडत उठून उभं राहतं आणि थेट आईला लुचू लागतं तसाच हा प्रकार.

स्तनपानामुळे बाळ सशक्त तर होतेच पण ते बाळ इतर मुलांपेक्षा बुद्धिमान व तंदुरुस्त राहते. कारण आईचे दूध हे बाळाला मिळणारे नैसर्गिक टॉनिक आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: