garbpatanatarchya-garbhdharane-baddal-mahiti-asayla-havya-ashya-goshti

 

एक अतिशय वेदनादायक आणि आणि भावनिक आघात करणारा अनुभव म्हणजे गर्भपात! या मागे कारण कोणते ही असो ,या अनुभवाला सामोरे जाणे एका स्री साठी नक्कीच सोपे नसते. काही न टाळता येणाऱ्या शारिरीक किंवा वैद्यकीय गुंतागुंती मुळे तर अनेकदा काही जोडप्याना उशिरा मूल हवे असते म्हणून गर्भपाताचा पर्याय निवडला जातो. तरीही, गर्भपात आणि त्या नंतर होणारी गर्भधारणा हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे आणि आपल्या समाजात या बद्दल पुष्कळ गैरसमज आहेत. गर्भपातानंतर पुन्हा आई बनण्याचा तुम्ही विचार करत असाल तर या लेखातून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

१. प्रजनन क्षमतेवर गर्भपाताचा परिणाम होत नाही.

गर्भपातानंतर स्त्रीला पुन्हा गर्भधारणा होत नाही असा सामान्य लोकांत भ्रम आहे. पण, तंज्ञांच्या योग्य मार्गदर्शनानुसार केलेल्या गर्भपाताचा प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होत नाही . प्रजननक्षम अवयवांना इजा झाली तरच अशी समस्या उद्भवू शकते. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारच्या गुंतागुंतीचे प्रमाण खूपच कमी आहे.

२. वारंवार होणारे गर्भपात तुमचे गर्भाशय कमकुवत बनवते

काहीही पर्याय नसताना नको असलेलया गर्भधारणेसाठी गर्भपात करणे एखादवेळी ठीक आहे,परंतू  लागोपाठ केल्या जाणाऱ्या अनेक गर्भपातांमुळे गर्भाशयाच्या मुखावर किंवा गर्भाशयाच्या आतील बाजूस जखमांचे व्रण पडण्याची भीती असते ,ज्यामुळे गर्भाशयाचे मुख कमकुवत बनते आणि याचा परिणाम म्हणजेच नाजूक आणि दुर्बल बनलेले गर्भाशय. अशा कमकुवत गर्भाशयात गर्भ टिकवून ठेवण्याची क्षमता कमी असते

३. गर्भपातानंतर सुरक्षित गर्भनिरोध पर्याय जरूर वापरा

गर्भपातानंतरही स्त्रीबीजकोशांची निर्मिती होत असल्याने गर्भधारणा होऊ शकते . त्यामुळे गर्भपातानंतर लगेचच तुम्हाला नको असणारी गर्भधारणा होऊ शकते . तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम नसताना अशी गर्भधारणा तुमच्या एकूणच आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

४. तज्ञांचा सल्ला अवश्य  घ्या

तुम्ही गर्भपातानंतर पुन्हा गर्भधारणेचा विचार करताय? तर मग डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन अवश्य घ्या. एका स्वस्थ गर्भधारणेसाठी तुमचे शरीर तयार आहे ना याचा अंदाज सर्व आवश्यक तपासण्या आणि चाचण्यांद्वारेच येऊ शकतो.

५. गर्भपातानंतर लगेचच गर्भधारणा टाळा.

तज्ज्ञांच्या मते, गर्भपातानंतर लगेचच होणारी गर्भधारणा हानिकारक ठरू शकते. गर्भपात आणि गर्भधारणा यां दरम्यान कमीत कमी तीन महिन्यांचे अंतर असायला हवे. तुमचे गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यासाठी हा कालावधी आवश्यक असतो. गर्भपातानंतर गर्भाशयाचे स्नायू सैलावतात आणि या दरम्यान गर्भधारणा झाल्यास गर्भाशय आकुंचन पावते, ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो. अशावेळी अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती उदभवू शकते. पुन्हा गर्भधारणा होण्यासाठी किमान सहा महिन्यांचे अंतर योग्य आहे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

६. फॉलीक ऍसिड चे प्रमाण वाढवा

तुम्ही गर्भपातानंतर गर्भधारणेचा विचार करत असाल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, फॉलीक ऍसिडच्या गोळ्या घेणे  त्तम. या अगोदर तुमचे अनेक गर्भपात झाले असतील किंवा तुम्ही वयापेक्षा उशिरा गर्भधारणा करत असाल तर तुमच्यासाठी हे आवश्यक आहे. फॉलीक ऍसिडच्या गोळ्या गर्भा दोष रोखतात आणि तुम्ही एका स्वस्थ गर्भावस्थेचा आनंद घेऊ शकता.

७. शरीर संबंधांची वारंवारता वाढवणे

जेंव्हा तुम्ही गर्भधारणेसाठी तयार असाल, तेंव्हा तुमच्या सर्वात जास्त प्रजननक्षम दिवसांत जोडीदारासोबत शरीर संबंधांचे प्रमाण वाढवा, कारण या दरम्यान गर्भधारणेची शक्यता सर्वात जास्त असते. गर्भपातानंतर संप्रेरकांचे (हार्मोन्स ) काम सुरळीत चालू राहण्यासाठी आणि तुमचे आरोग्य पूर्वस्थितीत येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो . सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, याने तुम्हाला गर्भधारणेसाठी नक्कीच मदत मिळेल.

८. गर्भधारणेसाठी सहाय्यक असणाऱ्या इतर पर्यायांची मदत घ्या

आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊनही काही स्त्रियांमध्ये गर्भपातानंतरच्या गर्भधारणेसाठी अडथळे येऊ शकतात. गर्भधारणेसाठी अतिशय उपयुक्त आणि सहाय्यक ठरणारा पर्याय म्हणून आयव्हीएफ आणि आयूएफ या आधुनिक आणि लोकप्रिय वैद्यकीय तंत्राचा नक्कीच विचार करावा. या सुविधा तुम्हाला सुसज्ज हॉस्पिटल मध्ये सहज मिळतील . आययूएफ तंत्रामध्ये बीज फलन गर्भाशयातच केले जाते, तर आयव्हीएफ या तंत्राद्वारे शरीरा बाहेर – एका काचेच्या डबीत (पेट्री -डिश ) बीज फलनाची प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर या फलित बीजाचे (भ्रूण ) रोपण  गर्भाशयात केले जाते . सामान्यतः आयूएफ तंत्राचा वापर हा सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहे. उपलब्ध असणाऱ्या सर्व पर्यायांचा शांतपणे विचार करून तुम्हाला योग्य वाटणाऱ्या सुविधेचा तुम्ही वापर करू शकता.

Leave a Reply

%d bloggers like this: