गरोदर असताना करायचे स्कॅन.
एक अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्याकरीता उच्च वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी असणाऱ्या ध्वनी लहरी तुमच्या गर्भाशयातून जातात. या लहरी तुमच्या बाळाला स्पर्शून परत येतात आणि संगणक या लहरींच्या प्रतिध्वनींवरून बाळाचे चित्र बनवते. हे चित्र बाळाच्या हालचाली आणि त्याचे स्थान दर्शवते. या चित्रात घन पेशी जसे की, बाळाची हाडे पांढरी तर मऊ पेशी जसे की, मांस हे करड्या रंगाने दाखवते. गर्भाशयातील द्रव कोणत्याही प्रकारचे प्रतिध्वनी देत नाही म्हणून हा भाग चित्रात काळ्या रंगाचा दिसतो. या रंगांमधील भेद डॉक्टरांना बाळाची हालचाल आणि स्थिती जाणून घेण्यास मदत करतो.
गर्भावस्थेच्या टप्प्यांना अनुसरून स्कॅन करून घेण्याचे प्रकार :
१. फलित झालेले बीज कुठे रुजले आहे याची खात्री करून घेणे. येथून तुमची नाळ वाढीस सुरवात होईल.
२. बाळाच्या हृदयाचे ठोके तपासून घेणे.
३. तुम्ही एका जीवाला जन्म देणार आहात की अधिक हे तपासणे.
४. गर्भधारणा योग्य स्थानी झाली आहे की नाही याची खात्री करून घेणे. कधी कधी अंड नलिकेत देखील गर्भधारणा होते.
५. काही रक्तस्त्राव होत असेल तर त्याची कारणे जाणून घेणे.
६. बाळाच्या आकारावरून गर्भधारणेची निश्चित वेळ काढणे.
७. बाळाच्या मानेमागे असणाऱ्या द्रवावरून डाऊन सिंड्रोम असण्याची शक्यता आहे कि नाही हे तपासणे. ही तपासणी ११-१३ आठवड्यांदरम्यान होऊ शकते. (nuchal translucency scan).
८. प्राथमिक रक्त तपासणी असामान्य असल्यास त्याचे कारण जाणून घेणे.
९. सीव्ही किंवा गर्भाशयातील पाणी काढण्याची प्रक्रिया व इतर तपासण्यांसाठी बाळाचे आणि नाळीचे व उशीचे गर्भातील स्थान जाणून घेणे.
१०. बाळाच्या सर्व अवयवांची योग्य गतीने वाढ होत आहे हे तपासून घेणे.
११. काही असामान्य जन्मजात दोष असतील तर ते तपासणे. जसे, स्पाइना बिफिडा म्हणजेच द्खंडित पृष्ठवंश.
१२. गर्भातील द्रवाचे मोजमापन करणे आणि नाळीच्या उशीचे स्थान निश्चित करणे.
१३. तुमचे बाळ सर्व स्कॅन प्रक्रियेतून कसे वाढत आहे याची तपासणी करणे.
१४. नाळेतून रक्त बाळाला योग्य रीतीने मिळत आहे याची तपासणी करणे.
काही महत्वाचे स्कॅन
१. तारीख निश्चित करणे आणि व्हायाबिलीटी स्कॅन.
सामान्यत: गर्भावस्थेच्या पहिल्या त्रैमासिकात ६ व्या ते ९ व्या आठवड्यादरम्यान हे स्कॅन केले जाते. गर्भधारणा निश्चित करण्यासाठी या स्कॅन ची गरज नसली तरी या स्कॅनद्वारे तुम्ही खालील गोष्टी जाणून घेऊ शकता-
१. गर्भात बाळ योग्य ठिकाणी स्थानीत आहे की नाही याची खात्री करून घेणे.
२. बाळाच्या हृदयाचे ठोके आहेत हे तपासणे, हृदयाचे ठोके ६ व्या आठवड्याच्या आसपास सुरु होतात. गर्भधारणा योग्य आहे याचे हे सर्वात महत्वाचे चिन्ह आहे.
३. तुमची प्रसूतीची तारीख शोधणे. तुमच्या शेवटच्या मासिक पाळीची तारिख तुम्हाला नक्की आठवत नसली तरीही अल्ट्रासाऊंड द्वारे तुम्हाला दिवस कधीपासून गेले आहेत हे कळू शकते.
४. जर रक्तस्त्राव असेल तर त्याची कारणे .
५. गर्भात किती जीव आहेत हे जाणून घेणे.
२. न्युकल ट्रान्सल्युसेन्सी स्कॅन (Nuchal Translucency scan)
न्युकल ट्रान्सल्युसेन्सी म्हणजेच गर्भातल्या बाळाच्या मानेच्या मागच्या बाजूस त्वचेखाली साठणारे द्रव. या स्कॅन द्वारे या द्रवाच्या जाडीची माहिती मिळते आणि जर बाळाला ‘डाऊन सिंड्रोम’ होण्याचा धोका असेल किंवा हृदयाच्या विकासाशी संबंधित काही कमतरता असेल तर त्याचे लगेच निदान करता येते. अल्ट्रासाऊंड द्वारे ही टेस्ट करता येते आणि जर या द्रवाचे प्रमाण जास्त असेल तर डाऊन सिंड्रोम चा धोका संभवतो.
या स्कॅन ला NT स्कॅन देखील म्हटले जाते. गर्भावस्थेच्या विशिष्ट काळातच ये स्कॅन केले जाते. हे स्कॅन ११ आठवडे अधिक २ दिवस आणि १३ आठवडे ६ दिवस या मधेच केले जाते जेंव्हा बाळाची क्राऊन-रम्प उंची (CRL) म्हणजेच डोक्यापासून ते पार्श्वभागापर्यंतची लांबी ४५ मिलीमीटर ते ८४ मिलीमीटर असते. ११ आठवड्यांपूर्वी हे स्कॅन करणे जरा अवघड असते कारण अर्भकाचा आकार अतिशय लहान असतो त्यामुळे इतक्या लवकर रक्त तपासणी करून डाऊन सिंड्रोम चे निदान करणे योग्य ठरत नाही तसेच १४ आठवड्यानंतर बाळाच्या लसिका यंत्रणेने या द्रव शोषून घेतल्यासही डाऊन सिंड्रोम चे निदान होऊ शकत नाही.
३. विसंगती शोधण्यासाठीचे स्कॅन (Anomaly scan)
हे स्कॅन दुसऱ्या त्रैमासिकात सगळ्यात जास्त प्रमाणात केले जाणारे स्कॅन आहे. हे स्कॅन १८ ते २० आठवड्यांमध्ये केले जाते. ह्या स्कॅनद्वारे खालील गोष्टी कळू शकतात.
१. बाळाची वाढ निट होत आहे आणि त्याच्या गर्भातील हालचाली.
२. बाळाचे अंतर्गत अवयव योग्य रीतीने विकसित होत आहेत याची खात्री करून घेणे.
३. काही जन्मजात व्यंग असतील तर त्यांचे निदान करून घेणे.
४. गर्भातील द्रवाचे प्रमाण मोजणे.
५. बाळाची नाळ आणि उशी तपासून घेणे.
६. गुणसुत्रांमध्ये असामान्यता असल्यास तपासून घेणे.
७. योनी मार्ग आणि गर्भ नाळेची तपासणी.
गर्भधारणेच्या अर्ध्या कालावधीपर्यंत तुमच्या बाळाचे जवळपास सर्व अवयव विकसित होऊ लागलेले असतात. सर्वच स्त्रिया या काळात स्कॅन करून घेतात जेणेकरून जर काही विसंगती असेल तर उपचार घेता येतील.
४. वाढीचे स्कॅन (Growth scan).
तिसऱ्या त्रैमासिकात बाळाची वाढ आणि विकास जाणून घेण्यासाठी ग्रोथ स्कॅन केले जाते. डॉक्टर यावेळी तुमच्या पोटाचा आकारची देखील तपासणी करून घेतील. स्कॅन करणारे डॉक्टर तुमच्या बाळाचा आकार खालील गोष्टींवरून तपासून घेतील :
१. बाळाच्या डोक्याचा परीघ.
२. बाळाच्या पोटाचा घेर.
३. बाळाच्या मंदीच्या हाडाची लांबी.
४. बाळाच्या आजूबाजूला असणाऱ्या गर्भाशायील द्रवाची खोली.
हे स्कॅन २५ ते ३२ आठवड्याच्या दरम्यान तिसऱ्या त्रैमासिकात केले जाते.
५. डॉप्लर स्कॅन (Doppler scan )
या प्रकारच्या अल्ट्रासाऊंडद्वारे बाळाचे आरोग्य तपासले जाते. बाळाच्या विविध अवयवांमधून होणाऱ्या रक्तप्रवाहाचे मोजमाप घेतले जाते जसे की मेंदू, हृदय आणि नाळ. याद्वारे बाळाला योग्यरीतीने ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये मिळत असल्याची खात्री करून घेतली जाते.
गर्भधारणेच्या काळात काळजीची गरज असल्यास डॉक्टर तुम्हाला डॉप्लर स्कॅन करून घेण्याचा सल्ला देतात. खाली दिलेल्या कारणांमुळे डॉप्लर स्कॅन करण्याची गरज पडू शकते:
१. जर तुम्ही जुळ्या बालकांना जन्म देणार असाल.
२. रीशस प्रतिपिंडांचा (rhesus antibodies) बळावर परिणाम होणार असल्यास.
३. बाळाला गालगंड असल्यास.
४. बाळाची योग्य गतीने वाढ होत नसल्यास.
५. जर तुम्ही बाळाच्या हालचालींमध्ये मंदपणा अनुभवल्यास.
६. जर तुमचे यापूर्वीचे अपत्य छोट्या आकाराचे असल्यास.
७. यापूर्वी जर तुमचा गर्भपात झाला असल्यास किंवा प्रसुतीवेळी तुम्ही यापूर्वी अपत्य गमावले असल्यास.
८. तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब अशा समस्या असल्यास .
९. तुमचा शरीर द्रव्यामान सुचांक (Body mass index) गरजेपेक्षा जास्त किंवा कमी असल्यास.
१०. तुम्ही धुम्रपान करत असाल्यास.
हे स्कॅन सामान्यपणे तिसऱ्या त्रैमासिकात २८-३२ आठवड्यामध्ये केले जाते.
वरील स्कॅन हे गर्भावस्थेतील धोक्याची पातळी कमी असणाऱ्या मातांनी कमीतकमी करून घ्यावयाचे स्कॅन आहेत. अजून काही स्कॅन जे आधी किंवा नंतर करून घेतले जातात ते पूर्वीच्या अथवा चालू गर्भधारणेतील समस्यांच्या उपस्थितीवर अवलंबून असतात. गर्भधारणेत करून घ्यावयाच्या स्कॅन्स ची जास्तीत जास्त अशी संख्या नसते. स्कॅन करून गेण्याची गरज परिस्थितीवर ठरते. आणि त्याची माहिती तुम्हांला तुमचे डॉक्टर वेळच्यावेळी देतीलच.