gokulashtam-ani-dahihandi-mahiti

लहान मुलाची चाहूल लागली की होणाऱ्या आई-बाबाना मुलगी हवा असो की मुलगा ते होणारे बाळ कृष्णसारखं  नटखट आणि गोड  असावं असं वाटत असतं. त्यासाठी कृष्णाचा गोडसा  फोटो देखील घरात लावला जातो. तर आज  कृष्ण जन्मानिमित्त   म्हणजेच गोकुळाष्टमी निमित्त आज आम्ही तुम्हाला या सणा विषयी काही  माहिती सांगणार आहोत.

जन्मतिथी 

श्री कृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला. याच दिवसाला आपण जन्माष्टमी किंवा गोकुळ अष्टमी असे म्हणतो

उत्सव साजरा करण्याची पद्धत

गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

दहीकाला/गोपाल काला 

विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला’ होय. श्रीकृष्णाने  गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करतात. तसेच श्रीकृष्णाला दही-दूध -लोणी असे दुधाचे पदार्थ खूप आवडत आणि पूर्वी ते उंच शिंक्याळ्यात ठेवले जात आणि ते पदार्थ श्रीकृष्ण आपल्या सवंगड्याच्या साथीने एकमेकांच्या खांद्यावर चढून काढत म्हणून दहीहंडी तयार करून ती फोडतात.

काल्यातील प्रमुख घटक आणि कृष्णभक्ती 

पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक श्री कृष्णाच्या विविध स्तरावरील भक्तीचे दर्शवतात

पोहे : पोहे हे श्रीकृष्णाला कधीच अंतर न देणाऱ्याचे प्रतीक

दही : वात्सल्य आणि राग अश्या मातृत्वाचे प्रतीक

दूध : गोपींच्या निर्मळ प्रेमळ भक्तीचे प्रतीक

ताक : गोपींच्या विरोधी आणि लटक्या रागाचे प्रतीक

लोणी : सर्वांचे श्रीकृष्णावर असलेल्या निर्मळ निर्मोही प्रेमाचे प्रतीक

विविध भागात कसा साजरा होतो 

कृष्णाचा जन्मदिवस संपूर्ण देशांत विविध पद्धतीने साजरा केले जातो. मथुरा, वृंदावन त्याचप्रमाणे श्रीकृष्णाची राजधानी असलेल्या द्वारका नगरीत हा सण विशेष मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. मध्यरात्री पाळण्यात श्रीकृष्णाची छोटी मूर्ती घालून सजवलेला पाळणा हलविला जातो, विविध गाणी, भजने गाऊन, रासलिला खेळून जन्मोत्सव साजरा होतो. उत्तरप्रदेशात या दिवशी रासलिला खेळली जाते. रंग उडवून आनंद व्यक्त केला जातो. दुसरे दिवशी नंदोत्सव साजरा करतात.

Tiny step परिवाराकडून सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा आणि दहीहंडी फोडताना काळजी घ्या. 

Leave a Reply

%d bloggers like this: