‘बाळ कुठून येते’ ? या प्रश्नाचे उत्तर मुलांना कसे द्याल?

 

लहान मुले बोलायला शिकली की खरच खूप गोंडस वाटतात. त्यांची बालसुलभ बोबडी बडबड चालू असते आणि काही काळातच ते अर्थपूर्ण बोलायला शिकतात. त्यांना काय हवे आहे, काय नको आहे हे ते स्वतः आपल्याला सांगतात आणि मग मात्र त्यांना शांत करणे अवघड होऊन जाते. अनेकदा त्यांची उत्सुकता त्यांच्या प्रश्नांमधून बाहेर येत असते. हे असे का? ते तसे का? अशाप्रकारे प्रश्न विचारून लहान मुले तुम्हाला त्रासवून सोडतात. 

        यात सगळ्यात जास्त मुलांकडून विचारला जाणारा प्रश्न म्हणेज “ आई, मी या जगात कसा आलो? आणि बाळ कुठून येते ?’’ या प्रश्नावर तुम्ही नक्कीच काहीतरी दंतकथा त्यांना सांगितल्या असणार आणि अनेकदा ‘’मी एके दिवशी देवाजवळ खूप प्रार्थना केली म्हणून देवाने खुश होऊन आम्हाला आशीर्वाद म्हणून तुला आकाशातून दिलं!’’ असं सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना कधी तरी उत्तर दिलं असणार.

पण लहान मुलांची चौकस बुद्धी आणि त्यांची दिवसेंदिवस वाढणारी उत्सुकता लक्षात घेता त्यांना अशी चुकीची माहिती देणे योग्य नाही. त्यांच्या या वयात आपण त्यांना जे सांगतो त्या गोष्टींचा त्यांच्यावर पगडा बसतो आणि त्याच त्यांना लक्षात राहतात. या गोष्टींमधून ते अर्थ काढत राहतात. तेंव्हा त्यांच्या मनात ही चुकीची गोष्ट कायम राहण्याऐवजी तुम्ही खालील काही मार्गांनी त्यांना या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता .

१)  विषय बदलू नका, त्यांच्या प्रश्नावर कायम राहा

मुले लहान आहेत आणि त्यांना या गोष्टीबद्दल काहीच कल्पना नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या. लहान मुलं अचानक कधीही हा प्रश तुम्हाला विचारू शकतात. त्यांच्या उत्सुकतेला दाबू नका. असा प्रश्न विचारल्यास विषय बदलून तो टाळणे म्हणजे त्यांची उत्सुकता अजून वाढवण्यासारखे आहे. अशावेळी तुम्हाला अवघडल्यासारखे वाटणे साहजिक आहे खास करून तुम्हाला दुसरे बाळ होणार असेल तर हा प्रश्न त्यांच्याकडून नक्कीच विचारला जाणार.

२) तुमचे मुल हा प्रश्न विचारण्यासाठी खूप लहान आहे का ?

नक्कीच नाही. जर तुमच्या मुलाला किंवा मुलीला हा प्रश्न पडत असेल आणि ते तुम्हाला त्याबद्दल विचारात असतील तर त्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी ते तितके लहान नाहीत. त्याऐवजी तुम्ही त्यांना बाळ आईच्या पोटात कसे निर्माण होते याबद्दल नक्कीच सांगू शकता. बाकीच्या गोष्टी वयानुसार तुम्ही त्यांना नंतर समजावून द्यालच.

३) चित्रांच्या मार्गदर्शकांचा वापर करा

एखाद्या ५ वर्षाच्या मुलाला कोणतीही गोष्ट समजावून देण्याचा सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे चित्रे. लहान मुलांना चित्रांद्वारे गोष्टी लगेच कळतात. त्यांना चित्रांचा वापर करून त्यांचा जन्म कसा झाला हे तुम्ही समजावून देऊ शकता. आजकाल बाजारात लहान मुलांना प्रेग्नेन्सी समजावून देण्यासाठी तक्ते किंवा चित्रे मिळतात. त्याचा वापर करून त्यांची उत्सुकता शमवण्याएवढी वरवरची माहिती माहिती तुम्ही त्यांना देऊ शकता.

४) सोप्या भाषेचा वापर करा

तुम्ही तुमच्या पाल्याला बीजाचे फलनीकरण आणि अंडाशयात त्याचे रुजणे ही प्रक्रिया समजावून सांगणार असाल तर त्यासाठी सोप्या भाषेचा वापर करा. तुम्ही वैज्ञानिक भाषा वापरलीत तर त्यांना यातून काहीच कळणार नाही आणि उलट त्यांना या शब्दांचे अर्थ न कळून मनात गरोदरपणा आणि बाळ होणे याविषयी भीती बसेल .

यासाठी तुम्ही सोप्प्या उदाहरणांचा वापर करू शकता जसे की बीज मातीत लावले आणि पाणी टाकले तर झाड उगवते. त्यांना कळेल असे शब्द वापरून त्यांना या प्रश्नाचे उत्तर दया जेणेकरून गैरसमज टाळता येतील.

५) योग्य शब्दांचा वापर करा

हा प्रश्न तुमच्या १०-१२ वर्षांच्या मुलांनी विचारला तर त्यांची याबद्दल दिशाभूल करू नका. त्यांना योग्य शब्दांचा वापर करून समजवा. शारीरिक अवयवांबद्दल बोलतांना योग्य तेच शब्द वापर जसे की योनीला ‘योनी’ असेच म्हणा. पुरुषांच्या लिंगाला सुद्धा ‘लिंग’च म्हणा. या शब्दांना ‘होहो’ किंवा ‘टॅको’ असले शब्द वापरून त्यांना समजावल्यास त्यांना संपूर्णपणे कळणार नाही आणि काही बाबतीत गैरसमज होतील कारण कदाचित ते त्यांचे स्वतः चे अर्थ लावू शकतात.

जर तुम्ही दुसऱ्यावेळी गरोदर असाल तर तुमच्या शिशूला गरोदरपणाच्या काळात तुमच्यासोबत राहू दया. त्याला सर्व गोष्टी आणि त्यांची काळजी घेणे समजून सांगा. त्यांच्या मनात गोष्टींबद्दल गैरसमज किंवा चुकीची माहिती बसणे अयोग्यच आहे.

लहान मुले असे आगळे-वेगळे प्रश्न त्यांच्या उत्सुकतेमधून विचारतच असतात. अशा मजेशीर प्रश्नांना उत्तर देतांना त्यांना योग्य ज्ञान देणे तुमच्या हातात आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: