लहान मुलांमधला भाषेचा विकास.    भाषा ही आपल्या जीवनातली अमुलाग्र गोष्ट असते. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी भाषा खूप महत्वाचा स्त्रोत असते. आपले मूल मोठे होत असतांना त्याच्यामध्ये या भाषेचा विकास उत्तमपणे व्हावा यासाठी पालक सजग असतात. त्यांचे व्यवहारज्ञान वाढवण्यासाठी भाषा हा मुलभूत घटक असतो. मुलांमध्ये भाषेचा विकास वयाच्या १२ व्या महिन्यापासूनच सुरु होतो. त्यापूर्वी मुल नुसत्या वेगवेगळ्या आवाजाने, अशाब्दिक पद्धतीने किंवा छोट्या छोट्या शब्दांच्या ओळखीने आजूबाजूच्या जगाशी बोलत असते. पालकांनी या वाढीच्या वयात मुलांशी भरपूर बोलले पाहिजे आणि सोबतच त्यांचे बोलणे ऐकून पण घेतले पाहिजे.

लहान मुले नवीन शब्द आणि भाषा ऐकतात ती त्यांच्या मेंदूद्वारे स्मरणशक्तीच्या खोलवर लवकर रुजवली जाते. ही माहिती किंवा शब्द त्यांच्या सुप्त स्मरणशक्तीमध्ये राहतात. आपण काही गोष्टी आपोआप करतो म्हणजे जसे आपले पायातले जोडे दिसल्यास घालून पाहणे, या गोष्टी आपल्याला शिकवल्या जात नाहीत त्या आपल्या सुप्त मनात असतात त्यामुळे वेळेवर त्या आपसूक बाहेर येतात. त्याचप्रमाणे त्यांच्या मेंदूत हे शब्द सुप्तावस्थेत जमवले जातात. याउलट प्रौढ व्यक्तींना नवीन भाषा शिकणे अवघड जाते.

लहान मुलांना नवीन भाषा शिकवणे सोप्पे करण्यासाठी आपण त्यांना गोष्टी वस्तूंशी जोडून शिकवल्या किंवा शब्द, वाक्य आणि त्याचे परिणाम पुन्हा पुन्हा त्यांच्यासमोर म्हटले गेले तर ते त्यांच्या स्मरणात नक्कीच राहतात. मुल ३ वर्षाचे होईपर्यंत त्याला एखाद वाक्य पूर्ण तयार करता येणे जमायला हवे. त्यांच्याशी त्यांच्या मातृभाषेत गप्पा मारा, त्यांच्याशी सगळे बोला म्हणजे त्याची भाषाविषयक माहिती आणि वाक्य तयार करण्याची क्षमता वाढेल.
शिशुसमोर तुमच्या जोडीदाराशी मातृभाषेतून बोला आणि त्याला तुमचे संभाषण ऐकू दया, समजून घेऊ द्या. लहान मुलांना संवादात सामील करून घ्या, त्यांना त्या भाषेतले चित्रपट दाखवा आणि सोबतच १ ते १० हे अंक देखील मोजायला हळू हळू शिकवा.


तुम्ही त्यांना इंग्रजी भाषा शिकवायला किंवा काही इतर भाषा जसे तमिळ, तेलेगु, हिंदी अशा भाषा सुद्धा प्राथमिक टप्प्यावर शिकवायला काही हरकत नाही. जरी या भाषा आयुष्यात नंतर शिकून घेणे शक्य असले तरीही किमान २ भाषा तरी लहान असतांना तुमच्या पाल्याला माहित करून देणे त्याला पुढे जाऊन उपयोगी ठरेल. याने त्यांचा गोंधळ उडणार नाही तर उलट त्यांना भाषाभाषांमधील फरक ओळखायला मदत होईल. लहान वयात अनेक भाषा शिकणे मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेत भर घालते

भाषा तोंडी शिकवल्यानंतर तुम्ही मुलांना हळू हळू लिहिणे आणि वाचणे शिकवू शकता. तुम्ही सुरवातीला त्यांना अक्षरांचे तक्ते दाखवून आणि मोठ्याने वाचून त्यांचा उच्चार शिकवू शकता. जर त्यांची चूक होत असेल किंवा त्यांना जमत नसेल तर त्यांना परत परत प्रेमाने शिकवा, याचा उपयोग त्यांना लिहिण्यासाठी होईल.
लिहिणे शिकवण्यासाठी त्यांना योग्य अशी अक्षर ओळख करून दया. उच्चार आणि अक्षर यांचा मेळ घालणे त्यांना जमायला हवे असे बघा. तुमच्या मागे त्यांना अक्षराचा उच्चार घोकायला सांगा. सुरवातीला त्यांना स्वर आणि व्यंजने यातील आवाजाचा फरक लक्षात येईल आणि नंतर व्यंजनांना स्वर लावून अक्षर/शब्द  तयार करणे ते शिकतील. वय वर्ष ४ होईपर्यंत मुलांना अक्षर लिहिणे जमायला हवे. यासाठी सगळ्यात पहिली पायरी म्हणजे त्यांना पेन्सिल कशी पकडायची इथून सर्व शिकवावे लागेल. तुम्ही त्यांना साधे साधे आकार जसे गोल, चौकोन, त्रिकोण कसे काढायचे किंवा उभा, आडव्या आणि तिरप्या रेषा शिकवून त्यांमधील फरक समजावून देऊ शकता. लिहितांना त्यांचा हात पकड आणि त्यांना वळण शिकवा. तुम्ही त्यांना आकारांवर गिरवायला देखील सांगू शकता. सराव केल्याने ते स्वतः हून हे सर्व काढायला लागतील.वेगवेगळे आकार त्यांना जमायला लागले कि तुम्ही त्यांना अक्षरे लिहायला शिकवू शकता. अक्षर आणि बाराखडी शिकवतांना त्यांचे उच्चार सुद्धा म्हणून दाखवा. आकार शिकवतांना ज्या प्रकारे तुम्ही हात पकडून वळण शिकवले असेल तसेच अक्षरे लिहितांना सुद्धा करा.

तुम्ही बाराखडीचे तक्ते दाखवून त्यांना अक्षरे विचारून त्यांचा उच्चार म्हणून दाखवायला सांगा म्हणजे लिहिण्याचा सराव अजून लक्षात राहील.

Leave a Reply

%d bloggers like this: