मासिक पाळीच्या वेळी येणारी अस्वस्थता ……..भाग १

स्त्रीला पाळी येणे, ती नियमित असणे हे स्त्री म्हणून तिच्या आरोग्याचे खास लक्षण मानले जाते. म्हणजे मुलगी वयात येणे ही एक महत्त्वाची बाब आहेच. अनेक सामाजिक ठिकाणी स्त्रीची पहिली पाळी केव्हा आली, याचाही आढावा घेतला जातो. कारण तिच्या नियमित येणाऱ्या पाळीमुळे तिला विवाहानंतर मूल होईल याची खातरजमा केली जाते. अर्थात, पाळी येणं ही एक नसíगक प्रक्रिया असल्यानं ती एक आरोग्यदायी गोष्ट निश्चितच आहे, असं आपण समजतो. 

   परंतु बऱ्याच वेळा मासिक पाळीच्या अनियमितपणामुळे म्हणा, कधी लवकर येण्याने किंवा कधी खूप उशिरा येण्याने बऱ्याच वैद्यकीय समस्या निर्माण होतात. अनेकदा आपण वयात आलेल्या मुलींना पाळी यायच्या काही दिवस आधी चिडताना, रागावताना किंवा उगाचच अस्वस्थ झालेल्या पाहतो. हे असे का होते, हे त्या मुलीला तर कळत नाहीच पण तिच्या आईलाही कळत नाही. मासिक पाळी संबंधी खूप गैरसमज असतात आणि त्याविषयी योग्य माहिती मिळत नसल्याने मुलींचा व स्त्रियांचा गोंधळ उडतो तेव्हा त्याविषयी सखोल मार्गदर्शन करणारा ब्लॉग. ह्या ब्लॉगचे दोन भाग आहेत. 

 

माझ्या माहितीतील रुचिका नावाची एक सोळा वर्षीय युवती मासिक पाळी यायच्या काही दिवस आधी विक्षिप्त वागत असे. अस्वस्थ होत असे. तिची आई तिला अशा पद्धतीने प्रत्येक महिन्यात चिडलेली, संतापलेली पाहून स्वत:च गोंधळून जायची आणि तिची मुलीबरोबर या काळात भांडणं व्हायची. तिच्या आईला कळायचेच नाही की, एरवी व्यवस्थित वागणारी ही शहाणी मुलगी पाळी यायच्या काही दिवस आधी अशी का घाबरते? अशी सुन्न का होते, एकटीच घरामध्ये का बसते? तिचा चेहरा घाबराघुबरा का होतो, तिच्या मनात भीतीची उगाचच आवर्तने उठायची. विचारले तर तिला काय सांगायचे सुचत नसे. 

पाळी तर तिची दर महिन्याला यायची. पण हा असा विचित्र अनुभवसुद्धा तिला यायचा. आतून तिला खूप घाबरल्यासारखे, दडपण आल्यासारखे वाटायचे. जीव उगाचच कासावीस व्हायचा. खाणे-पिणे सुचायचे नाही. कॉलेजला जाणे ती टाळायची. अभ्यास करायची नाही. डोळे सदा भरून आलेले. काही चांगला सल्ला द्यावा तर ती चिडचिड करायची. आरडाओरडा करायची. बऱ्याच वेळा तिच्या मनात या काळात आत्महत्या करावी असे विचारही उगाचच येत असत. असे विचार येतात म्हणून ती आणखी भयभीत होत असे. हा खरेच एक विचित्र आणि सहन न होणारा अनुभव आहे.

अनेक स्त्रियांना अशा प्रकारच्या अनुभवातून अगदी पाळीची सुरुवात होण्यापासून ते पाळी थांबेपर्यंत जावे लागते. पूर्वी या लक्षणाला नक्की काय म्हणावे हे कुणाला कळत नसे. पण आता याला प्रिमेन्सस्ट्रयल सिन्ड्रोम किंवा ‘पीएमएस’ असे म्हणतात. साध्या शब्दात हा मासिक पाळीपूर्वी येणारा आजार, असे म्हणावे लागेल. कधी कधी पाळी यायच्यापूर्वी महिलेला काहीसे नरमगरम वाटते. पण काही विशिष्ट लक्षणे सातत्याने पाळीपूर्वी दिसू लागली तर हा पाळीपूर्वी येणारा आजार असे ओळखले पाहिजे. 

पीएमएस हा मासिक पाळीपूर्वीच येतो आणि त्यात विविध प्रकारची शारीरिक व मानसिक लक्षणे दिसू शकतात. काही वेळा ही लक्षणे अगदी साधारण असतात. पण ती प्रत्येक पाळीपूर्वी येतात आणि ती येणार आहेत हे स्त्रियांना कळते. मध्यम किंवा तीव्र स्वरूपात पाळीपूर्वी येणारी ही शारीरिक वा मानसिक लक्षणे स्त्रीच्या दैनंदिन जीवनावरही नकारात्मक प्रभाव टाकतात. त्या दृष्टीतून पीएमएस हा वैद्यकीय आजार आहे असे म्हणायला हवे.पीएमएस नक्की कशामुळे होतो व का होतो, हे तसे सांगता येत नाही.

 पण स्त्रीची येणारी पाळी ही दर महिन्याला येते आणि त्यानुसार तिच्या शरीरात हार्मोन्सचे बदल चक्रांकित पद्धतीने होत असतात. इस्ट्रोजेन व प्रोजेसस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बदलत राहते आणि त्यावर पीएमएस होतो. या हार्मोन्सच्या बदलत्या पातळीनुसार मासिक पाळी येण्याअगोदरच्या सिन्ड्रोममध्ये, स्त्रीमध्ये भावनिक, शारीरिक आणि वर्तणुकीमध्ये बदल झालेले दिसतात. सामान्य शरीर-विज्ञान शास्त्राच्या दृष्टीनं स्त्रियांच्या बीजकोषातनं बाहेर पडणाऱ्या स्त्रीबीजाच्या दरम्यानच्या काळात हे बदल स्त्रीमध्ये दिसतात.

 पाळी येण्याच्या कमीतकमी दोन आठवडे अगोदर स्त्रियांमध्ये ही लक्षणे दिसून येतात. तिची पाळी सुरू झाली की ही लक्षणे पाळी संपेपर्यंत कमी होऊ लागतात. साधारणत: मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांमध्ये होणारे भावनिक बदल हे ग्रीक संस्कृतीमध्येही ओळखले गेलेले आहेत. बऱ्याच वेळा पीएमएस हे स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वामुळे होते की काय असे लोकांना वाटते. म्हणजे या स्त्रियांना चिडचिडायची व रागवायची सवय आहे, त्यामुळे अशी समस्या होते, असे लेबल लावून टाकले जाते. पण ते तसे नाही. खरे तर स्त्रीच्या स्वभावात किंवा भावनेत होणारा बदल हा तिच्या हार्मोन्समुळेच होत असतो. बऱ्याच वेळा हार्मोन्सबरोबर मेंदूतील सीरोटोनीन हे केमिकलसुद्धा पीएमएससाठी जबाबदार आहेत. 

                                                      साभार – लोकसता          डॉ – शुभांगी पारकर  

Leave a Reply

%d bloggers like this: