लहान मुलांना चांगल्या आणि वाईट स्पर्शबाबत असे जागरूक करा

लहान मुलांचे शोषण ही सगळ्यात दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. यातून लहान मुलांचे कोमल मन हेलावून जाते आणि त्याचवेळी त्यांच्यासोबत मोठ्यांकडून घडणाऱ्या या गोष्टी आई –वडिलांना कशा सांगाव्यात हे देखील त्यांना कळत नाही. याचे विपरीत परिणाम त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होत असतात.

आजकाल लहान मुलांच्या शोषणाचे हे किळसवाणे कृत्य किती ठिकाणी घडते आहे ते आपण वाचत असतोच. अशावेळी आपण सजग राहून आपल्या मुलांना याविषयी जागृत करायला हवे. मोठ्यांकडून त्यांच्या शरीराला होणारा स्पर्श चांगला की वाईट आणि त्यातील फरक त्यांना आत्ताच समजावून सांगणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हे सांगतांना तुम्हाला कितीही अवघडल्यासारखे वाटले तरीही मुलांना याविषयी जरूर सजग करा.

अजून एक सल्ला असा की मधून मधून या संवेदनशील विषयावर घरात मोकळेपणाने चर्चा होऊ दया. घरातले वातावरण मोकळे असले की मुलांना या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला चुकीचे वाटणार नाही.

१. लहान वयापासूनच सुरवात करा.

तुमचे मुल २-३ वर्षांचे असतांनाच त्याला याविषयी काही गोष्टी हळू हळू समजावणे सुरु करा. या वयात मुले बोलू-चालू लागतात आणि त्यांची वाढ होत असते. या वयातूनच त्यांना कळू लागते की आपल्या शरीराचे काही भाग हे खाजगी आहेत आणि त्यांना हात लावणे ही सामान्य गोष्ट नाही. ते अजून खूप लहान आहेत असं विचार सोडा आणि मधून मधून त्यांच्याकडे याविषयी विचारपूस करा.

२. सुरक्षितता


तुमच्या पाल्यांना हे समजून सांगा की तुमच्या अंतर्वस्त्रांनी झाकलेल्या शारीरिक भागांना कोणीही हात लावू शकत नाही. फक्त आई किंवा वडील त्यांना अंघोळ घालतात किंवा डॉक्टर त्यांच्या अंगाची तपासणी करतात तेही पालकांच्या समोर तेंव्हाच त्यांच्या या भागांना कोणी हात लाऊ शकतं. त्यांना असेही सांगा की कोणी याव्यतिरिक्त त्यांच्या या भागांना हात लावत असेल तर त्यांनी लगेच तुम्हाला येऊन सांगावे.

३. सहजपणे सांगा.


लहान मुले संवेदनशील असतात. त्यांना हे गोष्ट अचानक किंवा गंभीर वातावरण करून सांगू नका. त्यांच्या खेळण्याच्या वेळेस किंवा ते आराम करत असतांना त्यांना ही गोष्ट सांगणे योग्य ठरणार नाही. त्यांना सहजपणे आणि लक्षात राहील अशा वेळी सांगा. खूप गंभीरपणे सांगितल्यास त्यांच्या मनात ह्याविषयी भीती बसू शकते.

४. त्यांना यामागील तथ्य सांगा.


जरी तुम्ही ही गोष्ट त्यांना सहजपणे सांगणार असाल तरीही यामागील सत्य आणि माहिती त्यांच्यापासून लपवू नका. जसे जसे मुले मोठी होतात त्यांची याविषयीची जागरूकता वाढवा. सर्वप्रथम त्यांना शारीरिक भागांची माहिती करून दया. यासाठी तुम्ही चित्रांचा वापर करू शकता. मुले आणि मुली यांमधील फरक त्यांना समजवा. वयानुसार शारीरिक बदल आणि गरजा कशा वाढतात हे त्यांना कळू दया आणि मग बलात्कार, शोषण आणि छेडछाड याबद्दल सोप्याभाषेत सांगा. हे सांगतांना त्यांच्या मनात याविषयी भीती बसणार नाही याची काळजी घ्या.

५. वयानुसार मार्गदर्शन.


तुमचे पाल्य २ वर्षाचे असतांना त्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक सांगा. ते ४ वर्षाचे होईपर्यंत त्यांना या गोष्टी त्यांच्यासोबत घडल्या असतील तर त्या त्यांच्या शब्दात सांगता आल्या पाहिजेत. यामागील मुख्य मुद्दा असं की शाळेत जाण्यापूर्वी मुलांना या सर्व गोष्टींचे ज्ञान असायला हवे आणि अशी काही चुकीची गोष्ट त्यांच्या सोबत घडल्यास अशावेळी काय करायचे हे त्यांना माहित असायला हवे.

६. मुलांना ‘नाही’ म्हणायला शिकवा.लहान मुलांना कमी वयातच ह्या गोष्टीची जाणीव करून दया की प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने वागलेच पाहिजे असे गरजेचे नाही. त्यांना ‘नाही’ म्हणायला शिकवा. एखादी व्यक्ती, मित्र, नातेवाईक त्यांचे चुंबन घेत असतील किंवा मिठी मारत असतील आणि हे तुमच्या मुलांना आवडले नाही तर त्यावेळी ते टाळण्यात चुकीचे काहीच नाही याची जाणीव त्यांना करून दया. जर कोणी त्यांना मांडीवर बसायला सांगितले आणि त्यांना बसायचे नसेल तर ते ‘नाही’ म्हणू शकतात हे त्यांना सांगा. अशा छोट्या छोट्या गोष्टींना ते नाही म्हणायला शिकल्यास त्यांना पुढे जाऊन एखाद्या गोष्टीची संमती असणे किती गरजेचे आहे हे कळेल.

एक जबाबदार पालक म्हणून हे आपले काम आहे की आपण आपल्या मुलांना स्वसुरक्षित ठेवणे आणि त्यांच्या भवितव्यासाठी पाउल उचलणे.

तुमच्या सगळ्या ओळखीच्या पालक आणि मुलांसोबत हे शेअर करा.

Leave a Reply

%d bloggers like this: