नवजात बाळाला काय आणि किती समजत असते ?

एखाद्या दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या व्यक्तीप्रमाणे तुमचे बाळ या जगात नवीन असते. तुमची भाषा बाळाला कळणार नाही आणि बाळाला काय बोलायचे आहे ते तुम्हाला कळणार नाही. पण यात एक चांगली गोष्ट अशी की बाळ आपल्या मोठ्यांच्या क्षमतेपेक्षा खूप जलद शिकते आणि त्यामुळे तुमचा आवाज अगदी गर्भात असल्यापासूनच बाळाला ओळखता येतो. संवाद आणि सोबतच अजून अशा अनेक सवयी, संस्कार, आजूबाजूचे वातावरण तुमच्या बाळाचे व्यक्तिमत्व घडवत असते. ते कसे हे आपण पाहू.

शब्द – बाळाला शब्द नक्की केंव्हापासून समजायला लागतात.

सुरवातील , तुम्ही जे काही बोलता किंवा बाळाला सांगता ते बाळाला अजिबात कळत नाही. पण तुमचा आवाज ओळखू आला की बाळ शांत होते. गर्दीतले नवीन आवाज त्याला भीतीची जाणीव करून देतात. तुमचा आवाज बाळ गर्भात असल्यापासूनच ऐकत असते त्यामुळे त्याचा तुमच्या आवाजावर काही कळत नसले तरीही विश्वास असतो. हळू हळू एक टप्पा येतो जिथे तेच तेच शब्द ऐकून आणि त्या शब्दावरील प्रतिकृती पाहून बाळाला त्या शब्दांचे अर्थ उमगायला लागतात.

पहिल्यांदा येतात हातवारे. बाळ जवळपास ७ महिन्यांचे असते तेंव्हा बाळ हळू हळू साधे हातवारे करून आपल्या भावना प्रकट करायला सुरवात करते. सर्वाधिक वेळा लहान बाळे आपले दोन्ही हात तुमच्या दिशेने वर करतात तेंव्हा त्यांना म्हणायचे असते की त्याला तुम्ही कडेवर घ्यावे.

यानंतर साधारण ९ महिन्याचे असताना बाळ त्याच्या नावाला प्रतिक्रिया देऊ लागते. त्याच्याकडे बघून त्याचे नाव आपण सतत घेतल्याने त्याच्या मनात एक जाणीव निर्माण होते की या शब्दाशी आपला काहीतरी संबंध आहे आणि म्हणून कोणी त्याच्या नावाचा शब्द उच्चारला की त्याला आनंद होतो आणि त्या दिशेने बाळ प्रतिक्रिया देते.

असे करत १२-१५ महिन्यांच्या काळात बाळ शब्द समजायला लागते. लहान लहान शब्द जे सामान्यपणे त्याच्यासमोर उच्चारले जातात ते त्याला पटकन उमगतात. जसे की, ‘थांब’ म्हटले की बाळ जे काही करत असेल ते काम थांबते आणि ‘दे‘ म्हणून हात पुढे केला की आपण त्याच्या हातातली गोष्ट त्याला मागत आहोत हे त्याला कळते. एकूण साध्या साध्या गोष्टी, आवाजाची लय, त्यातल्या भावना त्याला कळतात.

भावना – बाळाला भावना कशा समजतात?

मानवी भावनांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणे अवघड आहे. भावना अनेक प्रकारच्या असू शकतात आणि वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांचे वेगवेगळे रूप असते. पण आपण ३ वर्षाच्या बाळाच्या भावना नक्कीच मर्यादित करू शकतो. भीती, प्रेम, आदर आणि कुटुंबातल्या व्यक्तींची काळजी ह्या भावना एका ३ वर्षाच्या मुलात असू शकतात.

लहान मुलांची भावनिक समज जरा अवघड असू शकते आणि तेसुद्धा अपेक्षांशिवाय. तुम्ही तुमच्या लहानगयाला या जगात आणण्यासाठी खूप कष्ट आणि शारीरिक त्रासातून गेल्या आहात याचा अर्थ बाळाने तुमच्यावर याबद्दल सतत प्रेमाचा वर्षाव केला पाहिजे असे नाही होऊ शकत. इथे तुमचे प्रेम कोणत्याही अटींशिवाय किंवा अपेक्षांशिवाय व्यक्त होत असते. भावनिक जवळीक साधणे ही एक प्रक्रिया आहे.

याची सुरवात होते ती तुमच्या बाळाला तुमच्याशी असणाऱ्या लळ्यापासून. बाळाला तुमचा सहवास आवडतो. तुमचा स्पर्श बाळाला सुरक्षिततेची जाणीव देतो. इतर कोणाच्याही स्पर्शाने ते रडायला लागते. आई हीच बाळासाठी एक विश्वास आणि सुरक्षिततेच स्थान असत. जेंव्हा कोणा दुसऱ्याच्या कड्यावर असलेलं तुमचं बाळ रडायला लागलं आणि तुम्ही त्याला जवळ घेताच बाळ शांत होत , त्याच्या डोळ्यातला तुमच्यासाठी असणारा हा विश्वास ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट असते. एक आई त्या बाळाच अख्ख जग असते आणि हा विश्वासच त्यांच्याकडून केली गेलेली तुमच्या प्रेमाची परतफेड आहे.

तुम्हाला पाहताच बाळ हसते. तुमची बाळासाठी आणलेले नवीन खेळणे बाळ आवडीने हातात घेऊन लगेच आपलेसे करून घेते. खेळताना बाळ तुमच्याकडे प्रेमाने बघते. आईने आणलेले खेळणे त्याला किती आवडले आहे हे त्याला सांगायचे असते. त्याचे गोंडस रूप तुम्हाला भुरळ पडते आणि तुमच्या भावनिक नात्याची माळ गुंफली जाते.

दोघांमधील महत्वाचे समीकरण.

तुमचे बाळ तुमच्यासोबत चांगले रुळले आहे. तुमचा आवाज त्याला धीर देतो, तुमच्यावर बाळाचा विश्वास असतो, तुमचा सहवास बाळाला भावतो. मुळात तुमच्या दोघात सगळे काही खेळी-मेळीत चाललेले असते. आता ही वेळ बाळाला जगाची ओळख करून देण्याची असते. हळू हळू आणि टप्प्या-टप्प्याने बाळाला आजूबाजूच्या गोष्टी शिकवणे तुम्ही चालू करता.

उदाहरणासाठी रांगणे घ्या. तुम्ही बाळासमोरून रांगून पुढे जा, बाळ लगेच रांगत रांगत तुमच्या मागे मागे येईल. तुम्हाला पकडण्याचा त्याचा प्रयत्न असेल. तुमच्या जवळ राहणे बाळाला हवे असते म्हणून ते तुमच्या मागे मागे येणार. आणि सगळ्यात मजेशीर बाब म्हणजे हे तुमच्यासोबतच घडते. दुसरे कोणी त्याच्यासमोरून रांगत गेले कि बाळ त्याचा पाठलाग नाही करणार. तुमच्यातला हा एक महत्वाचा भावनिक दुवा विकसित होत असतो.

असेच होते जेंव्हा तुम्ही बाळाला खेळतांना हवेत उंच फेकून परत पकडता. यावेळी बाळाला भीती वाटण्याऐवजी बाळ खिदळते. ही गोष्ट्सुद्धा इतर कोणाच्या बाबतीत घडत नाही. केवळ तुमच्यावरच बाळाचा विश्वास आहे.

यापैकी सगळ्यात गोंडस गोष्ट अशी की , बाळ तुमची नक्कल करण्याचा प्रयत्न करते. आता तुमच्यामधील समजूतदारपणा वाढला आहे. बाळ तुम्हाला ओळखते आणि विश्वास पण ठेवते. तुमच्या आजूबाजूला असण्याने बाळाला सुरक्षित आणि स्वतंत्र वाटते. बाळ हसू –खेळू लागते. त्याच्या मनातल्या अनेक गोष्टी त्याला तुम्हाला सांगायच्या असतात ते सांगतांना शब्द नसले तरी भावना त्याला जरूर समजतात. ‘आई’ आणि ‘बाबा’ त्याला म्हणता येत नसले तरी त्याच्या मनात तुम्ही दोघांच्या व्यक्तिरेखेबद्दल एक खास भावना जरूर आहे.

इतक्या लहान वयातील बाळाला समजून घेणे एक अवघड प्रक्रिया आहे. तुम्ही बाळासोबत एकटे असता तेंव्हा तुमच्यात घडणाऱ्या गोष्टी, संवाद, खेळ यातून बाळाची मानसिक प्रगती होत जाते. तुम्ही कशाप्रकारे तुमच्या बाळाला समजून घेता आणि त्याच्याशी संवाद साधता यातून बाळाचे भावनिक वर्तुळ आकार घेत असते.

Leave a Reply

%d bloggers like this: