पान्हा (स्तनपान) तोडल्यानंतर तुमच्यावर होणारे : शारीरिक आणि मानसिक बदल !

 

 बाळाचे नवीन जगात आगमन झाल्यानंतर केली जाणारी पहिली गोष्ट म्हणजे छातीशी घेऊन तुमच्या तान्ह्याला दुध पाजणे. पण काही काळानंतर बाळाला अंगावर  पाजणे हळूहळू कमी करत बंद करावेच लागते. प्रत्येक आई साठी हा काळ वेगवेगळा असू शकतो. कधी कधी बाळासोबत असलेले स्तनपानाचे नाते तोडणे आईसाठी एक भावनिक बदल असतो. तसेच काही शारीरिक बदलही होतात. अनेक मातांना  माहित नसते की, स्तनपान बंद केल्यानंतर त्यांना जाणवणारे अनेक बदल स्वाभाविक असतात. पान्हा तोडण्याचे शारीरिक आणि मानसिक बदल नेमके काय आहेत ?

चला तर पाहूया तुम्हाला माहित असायला हव्यात अशा ५ गोष्टी.

१) मनःस्थिती (मुड) बदलत राहणे

बाळाला स्तनपान करणे बंद केल्यानंतर तुम्हाला निराश वाटणे साहजिक आहे. अनेकींना काळजी आणि अस्वस्थता ही जाणवते.काही आठवड्यांनंतर असे वाटणे हळू हळू कमी होऊ लागते. पण तुम्हाला या भावना तीव्रतेने जाणवत असतील आणि अनेक आठवड्यानंतर हि अशी स्थिती जाणवत असेल तर स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या. असे भावनिक चढउतार पान्हा तोडतांना घडून येणाऱ्या संप्रेकांच्या बदलामुळे (ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन च्या प्रमाणात घट ) जाणवतात. प्रोलॅक्टिन हे संप्रेरक तणावमुक्त, हलके फुलके पणाची भावना जागे करते, तर ऑक्सिटोसिन ला ‘चांगलेपणाची अनुभूती देणारे संप्रेरक ‘ म्हणून ओळखले जाते, हे सिद्ध झालेले आहेच. स्तनपानामुळे आई आणि बाळातील शारीरिक आणि भावनिक जवळीक आणखी मजबूत होते. स्तनपान थांबवल्यानंतर तुमच्या जीवनातील एक खास अवस्था संपते आणि साहजिकच या सर्व भावनांपासून ताटातूट झाल्याची जाणीव होते.         

 

२)  दूध पूर्णपणे आटण्यासाठी वेळ लागतो

बाळाचा पान्हा पूर्णपणे तोडलय नंतर ही कधी कधी स्तनातून दूध बाहेर आल्याचे आईला लक्षात येते. दूध पूर्णपणे सुटण्यासाठी लागणार वेळ प्रत्येकीसाठी वेगळा असतो. ज्या माता बरेच दिवस आणि सतत बाळाला स्तनपान करतात त्यांना तर दूध आटण्यासाठी काही आठवडे किंवा महिने ही लागू शकतात. खरे तर, ही एक ‘मागणी तसा पुरवठा ‘ प्रक्रिया म्हणावी लागेल.  कारण जेवढे अधिक दूध पाजले जाते तितक्याच जास्त प्रमाणात ते तयार होत असते. जेव्हा बाळाला वारंवार स्तनपान करवले जाते तेव्हा भरपूर दूध येत असते आणि यामुळे दूध कमी व्हायला आणि दूध तयार होणे पूर्णपणे थांबायला जास्त वेळ लागतो.               

३) मासिक पाळी पुन्हा सुरु होणे

स्तनपान करवणे सुरु असतांना अनेक जणींना मासिक पाळी येत नाही आणि म्हणूनच बाळाला स्तनपान करवणे सुरु असतांनाचा हा काळ हा एक गर्भनिरोधक म्हणून ओळखला जातो. बाळाचा पान्हा तोडणे  सुरु करताच तुमचे मासिकचक्र हळूहळू सुरु होईल. हो, पण याचा अर्थ असा नव्हे कि स्तनपान सुरु असतांना तुंम्हाला गर्भधारणा होणारच नाही!

४) गर्भधारणेपूर्वी असलेला स्तनांचा आकार परत येणे

बाळाचा पान्हा तोडत असतांना दूध तयार करणाऱ्या  ग्रंथीचा आकार हळूहळूकमी होऊ लागतो. चरबी निर्माण करणाऱ्या पेशी मर्यादित होतात आणि तुमचे स्तन गर्भधारणे आधीच्या आकारात परत येतात आणि यासाठी काही आठवडे लागतात.

५) स्तनामध्ये गाठ येणे

अचानक स्तनपान करवणे बंद केल्यास स्तनांमध्ये दूध साचून राहणे,स्तनांतील नलिकांचे बंद होणे किंवा स्तनदाह होऊ शकतो. अशा वेळी हाताने स्तन दाबून दूध काढून टाकावे जेणेकरून तेथील नलिका बंद होणार नाहीत. असे केल्यास स्तनात गाठ होणार नाही.ज्याचे रूपांतर पुढे गळू मध्ये होण्याची शक्यता असते. स्तनातील गाठ किंवा या भागातील बंद नलिकांची वेळीच काळजी घेतली तर फक्त स्तनाच्या आरोग्याची चिंता करण्याची गरज नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: