दिवाळीतील धनत्रयोदशीचे महत्व आणि खरेदी

१) धनत्रयोदशी आणि यमदीपदान 

आज धनत्रयोदशी दिवाळीतील पाच महत्वाच्या दिवसांपैकी एक दिवस आज धनत्रयोदशी तर या दिवसाबद्दल अशी कथा सांगण्यात येते की कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतो. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी काही ठिकाणी धणे आणि गूळ आणि काही दागिने/धन या गोष्टींची पूजा करण्यात येते.

या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

२) धन्वंतरी जयंती 

धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. धन्वंतरी आयुर्वेदाचा औषधाची देवता मानण्यात येते. (कदाचित विविध आजारवरची औषधे हेच अमृत धन्वतरी घेऊन प्रगट झाले असतील) यावेळी प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

३) या दिवशी या गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते

१) असे मानले जाते की, धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी समुद्र मंथना दरम्यान अमॄत घेऊन प्रकट झाले होते. या दिवशी पितळ खरेदी करणे शुभ मानले जाते. पितळ हे भगवान धन्वंतरीचा धातू मानलं जातं. पितळ खरेदी केल्याने घरात आरोग्य, सौभाग्य आणि सुख नांदतं.

२)धनत्रयोदधीच्या दिवशी चांदी खरेदी करणेही शुभ मानलं जातं. घरात धन आणि समृद्धीही वाढते. या दिवशी घरात धातूच्या वस्तू आणल्यास उद्योगधंद्यात  फायदा होतो. याच दिवशी भगवान गणेशाची आणि देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणेही शुभ मानलं जातं. असे केल्यास घरातील आर्थिक संकट दूर होतं, असं मानलं जातं.

३) धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेराच्या पूजेलाही मोठं महत्व आहे. या दिवशी कुबेराचा फोटो विकत आणा. तो उत्तर दिशेला स्थापित करा. असे केल्याने धनलाभ होऊ शकतो. तसेच या दिवशी शंख खरेदी करणेही शुभ मानले जाते. 

Leave a Reply

%d bloggers like this: