तुम्ही ह्याप्रकारे जुनी दिवाळी अनुभवली आहे का ?

 

आजचा लेख तुम्हाला जुनी दिवाळीविषयी माहिती होईल. आणि तुमच्या लहानपणीची आठवण ह्या लेखाने होईल.

माणूस तसा स्मरणरंजनप्रिय आहेच. थोडासा धक्काही भूतकाळातील आठवणींकडे ढकलायला पुरेसा होतो. एका नातवाच्या थोड्याशा धक्‍क्‍याने एक आजीही भूतकाळातल्या दिवाळीत रमली. त्याचीच ही गोष्ट.

संध्याकाळी देवापुढे दिवा लावला. हातात पोथी घेतली व वाचायला सुरवात करणार, तेवढ्यात माझा आठ-नऊ वर्षांचा नातू धावत आला आणि म्हणाला, “”आजी, आजी या दिवाळीत आपण कोठे जाणार माहीत आहे का? अगं दिवाळीत आपण विमानाने गोव्याला जाणार आहोत आणि तिथं गेल्यावर काय मज्जा माहीत का? बीचवर जाणार, हॉटेलमध्ये पिझ्झा, उत्तप्पा, डोसा खाणार. आहे की नाही मज्जा!” तो परत खेळायला गेलाही; पण माझ्या मनात विचारांचे काहूर उठले. म्हटले, दिवाळीत, सणासुदीला आपले घर सोडून गोव्याला जायचे? मला माझी साठ-सत्तर वर्षांपूर्वीची लहानपणीची दिवाळी आठवली.

दिवाळीच्या आधी महिनाभर आमची दिवाळी सुरू व्हायची. घराची स्वच्छता, घर झाडणे, भिंती सारवणे. तेव्हा काही सिमेंटची घरे नव्हती. साधे आपले मातीचे, खेड्यातले घर. आई, आजी, काकू सगळ्या जणी कामाला लागायच्या. स्वच्छता झाल्यावर दळणाचा कार्यक्रम असायचा. दळण बहुतेक घरी जात्यावर व्हायचे. गहू, भाजणी, डाळीचे पीठ, चकलीचे पीठ ही सर्व दळणे बहुतेक जात्यावर पहाटे दळायची. दळण, स्वच्छता झाली की मग चटण्या करायच्या. अनारशाचे पीठ व्हायचे.मग आठ-दहा दिवस पुरेल इतके म्हणजे दिवाळी संपेपर्यंत चुलीला लाकडे, शेगडीला कोळसे असा जळणफाटा आणून ठेवायचा. चूल-शेगडी हेच स्वयंपाकाचे साधन होते. त्या वेळी गॅस नव्हता. आता दिवाळी आठ दिवसांवर आली, की फराळाचे पदार्थ करायची आईची लगबग असायची. तेव्हा बाहेरचे फराळाचे मिळतही नव्हते आणि घरी फराळाचे पदार्थ करणे हेच खरे होते.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसेला सकाळी लवकर उठून आंघोळी उरकून आम्ही लहान मुले, आई, काकू, आजी आमच्या घराजवळ नदीच्या काठी दत्तगुरूंच्या देवळात दर्शनाला जात असू. वाहन बैलगाडी. देवाचे दर्शन घेतल्यावर आम्ही नदीच्या वाळूतले शंख, शिंपल्या गोळा करत असू. आई वाळूतले शिरगोळे जमा करायची. शिरगोळे कुटून, चाळणीने चाळून रांगोळी तयार व्हायची. तीच रांगोळी आम्ही अंगणात काढत असू. धनत्रयोदशीला आम्हा मुलींना आई न्हायला घालायची. अंघोळीच्या वेळेस उटणे म्हणजे एका वाटीत डाळीचे पीठ व त्यात दूध घालायचे. ते एकत्र करून लावायचे. तेच आमचे उटणे. नरकचतुर्दशीला पहाटे चार-साडेचारलाच बायका उठायच्या. चुलीत पेटते घालून गरम पाण्याची व्यवस्था करायच्या. थोड्या वेळातच न्हावी यायचा. त्या वेळी अशी प्रथा होती, की नरकचतुर्दशीच्या पहाटे केसकापणी, दाढी न्हाव्याकडून करून घ्यायची. मग लगेच अंघोळ. अंघोळीला बसल्यावरसुद्धा दोन तांबे अंगावर घेतल्यावर अंघोळीच्या मध्ये वडिलांना कणिकेचे दिवे, त्यात वात, तेल घालून त्या दिव्यांनी आई औक्षण करायची.

त्या वेळी बाराबलुतेदार असत. ते शेतीशी निगडित असत. सुतार बैलगाडी, वख्रर-पाभर लाकडाचे करून द्यायचे. लोहाराकडून विळा, खुरपे, गाडीची धाव (धाव म्हणजे गाडीच्या चाकाला लोखंडाचे गोल आवरण) बनवायचे. शिंपीदादा वर्षाला लागणारे कपडे शिवायचे. चांभाराकडून घरातल्या माणसांना चप्पल शिवून मिळायची. या कामांच्या बदल्यात बलुतेदारांना शेतकऱ्याकडून वर्षभर पुरेल इतके धान्य दिले जायचे. पैसे त्या वेळी एवढे नव्हतेच. सर्व व्यवहार धान्य-वस्तूंच्या बदल्यात चालायचे. एवढेच काय; पण गोडेतेलसुद्धा आई तेलीणीला करडई-शेंगाचे दाणे, तीळ देऊन घ्यायची.

दिवाळीतल्या दिवशी तर फारच मज्जा. थोडेबहुत फटाके असायचे. फराळ केलेला असायचा. तरी आई देवाला नैवेद्य म्हणून घरी दळलेल्या गव्हाचा शिरा करायची. तोपण साजूक तुपाचा, गुळाचा. नंतर सगळ्यांचा फराळ व्हायचा. आई मात्र त्या दिवशी संध्याकाळपर्यंत काही खात नसे. आम्ही तिला विचारत असू, “”तू का काही खात नाहीस?” म्हणायची, “”आज लक्ष्मीपूजन. आपल्या घरी लक्ष्मी यायची. आपल्याकडे कोणी पाहुणे यायचे असले, तर आपण पाव्हण्यांच्या आधी काही खातो का? नाही ना! मग आज लक्ष्मीपूजन झाल्यावर, नैवेद्य दाखवल्यावर मी जेवेन.” पाडवा. 

भाऊबीज, दिवाळी झाल्यावर ओवाळी. मग जो कोणी येईल त्याला फराळ द्यायचा. दिवाळी संपली की आम्ही लहान मुले, आई व मोठी माणसे घराजवळ आठ-दहा मैलावर असलेल्या शिर्डीला जायचो. तेव्हा शिर्डीला एवढे महत्त्व नव्हते, आज आहे एवढे. साधी समाधी होती. माणसांची गर्दी नसायची. निवांत दर्शनसुख मिळायचे. सकाळी गेल्यावर तेथेच शिर्डीच्या साईबाबांच्या बागेत डबे खायचे. संध्याकाळी घरी परत.

ती पूर्वीची दिवाळी आणि आजची दिवाळी यात किती फरक आहे, नाही? तेवढ्यात सूनबाईंनी हाक मारली, “”अहो सासूबाई, झाली का पोथी वाचून? उपवास सोडायचा ना? चला तर मग!”

                                                   शालिनी बेल्हे   साभार – सकाळ

Leave a Reply

%d bloggers like this: